Saturday, April 4, 2009

माझी खोली

माझी खोली म्हंटलं की त्याला एक 'मी'पणाचा स्पर्श आहे। आणि तसा प्रत्येकाचं असतच . किरकोळ वस्तू असोत, कवितांची वही असो, फोनवर बोलताना गिरवलेले कागद असोत. त्यात मी असते विखुरलेली. तरीही एकसंध असं काहीतरी. कदाचित सगळ जगणच माझं अस आहे.


म्हणजे कधी मला विरक्ती घ्या अस सांगितल तर बहुदा सगळ्यातला मोह सोडायला मला दोन-चार वर्षं जातील (कमीच सांगितली का ;)


प्रत्येक वेळी नवा छंद , त्याचा सगळा पसारा, दरवेळी वाटतं हां हे आपलं फ़ायनल एम. पण नवखे चार दिवस टिकतात, परत नवा गडी नवीन राज्य. नाही म्हणायला कविताच बरी टिकली खरी. मी कित्येकदा सोडलय तस तिला पण प्रत्येक वेळेस , दूर सोडलेल्या मांजरासारखी मला शोधत शोधत परत आलीये.
कुठे जन्म होतो तिचा अजूनही मला पत्ता नाही। म्हणजे गल्लीच्या टोकापर्यंत तर तिला पाहिलं होत, एवढ्यात कुठे गेली माहीत नाही अस होतं.


तरी मला आवडतं असं विखुरलेलं , आणि अस्ताव्यस्त आयुष्य जगायला। स्वत:च एकटेपण एंजॉय करायला। माणसं हवीतच आजूबाजूला. पण त्या सार्‍यात माझी एक स्वतंत्र खोली आहे. कदाचित खूप गहिरी, अंतर्मुख, हळवी तितकीच कट्टर. प्रवेश बंद ची पाटी नाहीये दारावर, पण रस्ता इतका अवघड आहे की फ़ार थोडे पोचलेत तिथवर. 'एंजल्स & डेमन्स' मधला लास्ट लेयर समजा. तसा प्रत्येकाचाच असावा थोड्याफ़ार फ़रकाने.


अगदी खूप ओळखीच्या माणसांना तरी आपण किती कमी ओळखतो. अचानक एका दिवशी वाटतं अरे तो असा असेल असं वाटलं नव्हतं. ते वागणं त्या आतल्या खोलीतल्या शेल्फ़वरून चुकुन बाहेर आलेलं असतं.

Monday, December 29, 2008

बदल

"चला बाय. हॅव अ नाईस वीक एन्ड ""बाय, सोमवारी भेटू गं. दोन दिवस नाहीयेस ना ........ एन्जॉय. "

खूप दिवसांत जमलं नव्हतं. ह्या शनिवरी रविवार अगदी वेळ काढून गावी जायचं ठरवलं. आजोबा गेल्यापासून तिथलं घर बंद पडलंय. जी काही थोडीफ़ार शेती होती ती विकायचा धीर होईना. आजोबा होते तो पर्यंत शेवटपर्यंत सगळं बघत होते. इतक्या वर्षानुवर्षं असलेली जमीन थोड्याफ़ार पैशासाठी विकली नाही. एक गडी ठेवलाय तो बघतो सगळं. मी अधूनमधून चक्कर मारून येते. पण एवढ्यात तेही जमलं नव्हतं.

अलार्म वाजला. दूर कुठेतरी काहीतरी वाजतंय एवढीच जणीव झाली. मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. शनिवारी सकाळी पण लवकर उठायचं म्हणजे जीवावर येतं. पण आज कार नव्हती. नेमकी दुरूस्तीला गेली होती. म्हणजे धडपडत जाऊन एस.टी. पकडली पाहिजे.

सुखवस्तू राहायची सवय झाली की छोट्या छोट्या गोष्टीतले कष्टसुद्धा नकोसे वाटू लागतात. इतकी वर्ष कार नव्हती तेव्हा एस. टी. च्या जिवावरच सगळं चाललं होतं. पण आज तोच वास, ती अडाणी गर्दी नको वाटत होती. सगळे विचार झटकून आवरलं. बस पकडली. खिडकीजवळची जागा पकडून बसले.

थोड्या वेळाने एक कळकट धोतरवाला माणूस आला.

"ताई वाईच सरकून घ्या."
मी आखडून बसले, त्याचा स्पर्श होऊ नये असा अशक्य प्रयत्न करत. त्याच्या अंगाला खास गावातल्या शेणाचा वास येत होता. त्याने चंची काढली, सुपारीची खांड कातरून तोंडात टाकली. डोक्याचा फेटा सोडला, त्यालाच हात पुसले. टीश्यू पेपर ची सवय झालेल्या माझ्या शहरी मनाला कसंसंच झालं.

मी दुर्लक्ष करून बाहेर बघू लागले. हवा छान होती. प्रसन्न आणि ताजी. घाट, डोंगर, श्रावणातली ओली हिरवळ पसरलेली. मन गावात जाऊन पोचलं होतं. पण आत आजीची वाट बघणारी नजर नसेल दारात.
"थांब गं पोरी, तुकडा ओवाळून टाकते. मग आत ये."
असं म्हणणारं पण कोणी नसेल. पण अंगणातला पारिजातक असेल, माझ्यासाठी मखमली गालिचा पसरून वाट बघत असेल. दार उघडताना कडी कुरकुरेल. किती दिवसांनी आलीस असं विचारेल.
विचार करता करता कधी गाव आलं कळालंच नाही . वाड्याचं दार उघडलं , कडी कुरकुरली. ओळखीचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं . खूप दिवस बंद राहिल्याचा कोंदट वास भरला होता. सगळी दारं खिडक्या सताड उघडी टाकली . कोण आलंय बघायला उन्हाचे कवडसे डोकावले. वार्‍याने सगळीकडे फ़िरून पाहिलं . आता कसं घर भरल्यासारखं वाटलं. कितीतरी वेळ नुसतीच बसले.

बाहेर ओसरीवर कुणाचीतरी चाहूल वाटली म्हणून बाहेर आले. बघितलं तर शिरपा.

"अरे शिरपा तू होय. ये ये. तुला बरा सुगावा लागतो मी न कळवता आले तरी."

"तसं न्हाई ताई . चावडीवर एक पोरगं भेटलं . त्याने पाह्यलं तुम्हास्नी. त्येच्याकडून कळलं."

"झालं म्हणजे गावभर खबर झाली असणार."

"अवं ताई , शंभर एक उंबर्‍याचं गाव. कुणी शिंकलं तरी कळणार. तर तुमचं येणं लपणार हाये होय ?"

"बरं बरं .. तुला निरोप पाठवणारच होते . मलाही खूप दिवसात यायला जमलं नाही . काय खबरबात. कसं चाललंय सगळं?"
"ठीक हाये. वरच्या रानात पेरणी झालीया. औंदा पाऊस तर चांगला झालाया. इकडच्या तुकड्याचा ऊस तोडणीला आलाय. कारखान्याची दरयेळची बोंब हायेच. बघू पुढच्या आठवड्यात एकदा पाणी फ़िरवून मग लावू तोडणीला. बिगारी बी मिळेनासं झालेत आजकाल. जो तो शहरात पळतोय. तुमी नगा काळजी करू. मी बघतो की सगळं. तुमी आलासा तं आरामात र्‍हावा चार दिस. सदा आपली लगबग. शेवंताला धाडतो सफ़ाईला."

"अरे नको. मी घेईन तेवढं करून. तसंही उद्या संध्याकाळी जायचंय परत"

"गाडी न्हाई दिसली:

"नाही आणली ह्या खेपेला"

"खालच्या मळ्यातली केळी लागली का रे?"
"लागायला लागलीयेत. केळफ़ूल पाठवतो. हाये माझ्या ध्यानात सारं"
मी हसले. शिरपा शेतीचं सारं बघत होता. अगदी मन लावून. कधी पैशाचा हव्यास नाही. फ़सवाफ़सवी नाही. हिशोबाला चोख. मला सगळं जमेना तेव्हा त्याला वाटेकरी करून घेतला. तसंही शेतावर राबणं... राबणं सोडाच नुसती देखरेख करणं हेदेखील मला शक्य नव्हतं. शहरी माणसांचं काम नाही. शिरपा बघायला लागल्यापासून मी निश्चिंत झाले होते. आजोबा असताना तो आमची गुरं सांभाळायचा. नंतर गुरं विकली. त्याची स्वत:ची जमीन नव्हती. पण त्याला शेतीतली माहिती चांगली होती. म्हणून त्याच्यावर सोपवलं.

"बस रे. मी चहा टाकते. मलाही घ्यायचाच आहे. आणि आत येऊन बस. ऊन तापायला लागलंय"

"न्हाई ताई. च्या नगं. आणि मी इथच ठीक हाये."
"आत चल आधी मुकाट्याने."

मी चहा टाकायला आत गेले. आधण ठेवलं. कपबशा काढायला गेले आणि आजीची आठवण झाली.

" खालच्या फ़डताळात गडी माणसांसाठी वेगळ्या कपबशा अहेत. त्यात दे. उगाच लाडावून ठेवू नकोस."
मला हसायला आलं. मी नेहमीच्या वापरातल्याच दोन कपबशा काढल्या. शिरपा आत आलेला दिसला.
"अरे वर बस. खाली नको बसूस."
"न्हाई न्हाई. मी हिथं ठीक हाये."
चहा घेऊन बाहेर आले. एक कप शिरपासमोर धरला.
" ठेवा खाली ताई. मी घितो."
मी कप खाली ठेवला. अशाच गप्पा मारत मारत चहा झाला. शिरपाने चहा घेऊन बाहेरच्या नळावर कप विसळून परत आणून खाली ठेवला.
"ताई पाणी घालून घ्या."
"शिरपा काही गरज आहे का याची? मी तुला कधी असं वागवलय का? शिवू नकोस, घरात येऊ नकोस म्हंटलंय का कधी?"
"तसं न्हाई ताई . तुमी वाईट वाटून घेऊ नका. पण सवयच झालीये. आणि गावातले लोक....."
"हे बघ. मी हे अस्पृश्य वैगेरे काही मानत नाही. आणि गावातले लोक काय विचार करतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही."

"ताई तुम्ही शिकल्यासवरल्या. शहरात राहता म्हणून असा विचार करता. पण गाव अजून तसच हाये."
"हो पण किती दिवस. आता बदलायला हवं ना. जग कुठे चाललय?"

"ताई रागावू नका अशा. सवय न्हाई जात. ५-६ वर्षाचा व्हतो तवाधरनं बा बरुबर गुरं राखाया जायचो. बामनाच्या वाड्यावर गेलो की बा सारखा सांगायचा. हिथं बस, आत जाऊ नगंस, कशाला हात लावू नगं . अन त्यादिवशी बामनाची पोर अंगणात खेळत हुती. खेळताना पडली म्हणून उचलायला धावलो. चाबकाचे फ़टके बसले पाठीवर शिवाशिव केली म्हणून. बा जे सांगायचा प्रयत्न करत हुता ते त्यादिवशी रक्तात भिनलं"

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शिरपा जो बामन म्हणत होता ते कदाचित माझेच आजोबा..... अंगावर काटा आला. माझंच रक्त आता बेइमानी करून उठलं. डोकं सुन्न झालं. काहीच सुचेना.

"जाऊ द्या ताई. तुमी नगा तरास करून घेऊ."
"अरे पण काळ बदलला आता."
"ताई काळ बदलला पण रक्त न्हाई बदललं. जे रक्तातून वाहतं पुसता न्हाई येत ताई."
शिरपाने मला निरुत्तर केलं. मला काय बोलावं सुचेना. मला सकाळची एस.टी. आठवली. अंग चोरून बसलेली मी. .....अंगात वाहणारं रक्त........ चाबकाचे फ़टके........ड़ोळे धूसर झाले. कुठल्याशा प्रेरणेने मी म्हणाले.
" चल तुझं खोपटं दाखव मला. उद्या पिठलं भाकरी खायला येणार आहे."
"ताई पण...."
" चल म्हंटलं ना ...."
रक्त पण बदललंय हे सिद्ध करायचं होतं मला जणू........

दीपा कुलकर्णी -मिट्टीमनी.

Thursday, September 18, 2008

ऍबस्ट्रॅक्ट आर्ट

माझ्या ऑफिसमधे एक चित्र लावलय। कसल आहे ते मी सांगू शकत नाही कारण मलाच अजून ते कळलं नाहीये. दरवेळी तिथून जाता येता जेव्हा जेव्हा मला ते चित्र दिसतं, मी थबकते. कारण काही कळतच नाही नक्की काय काढलय.


त्याच्या शेजारी अशी एक भली मोठी माहिती लिहिली आहे। त्याच्यावरून मला कळलं ह्याच नाव "मॉर्नींग परस्पेक्टीव्ह " अस आहे. आणि ते ऍबस्ट्रॅक्ट आर्ट आहे. त्या चित्रकाराने मोठ्या मोठ्या शब्दात सकाळ्ची किरण, प्रकाश, नवीन सुरूवात अस काहीस लिहिलय.


झालं मग काही दिवस मी निरीक्षण केल, कुठल्यातरी ऍंगलने त्यात सकाळ, उत्साह, किरण असं काही दिसतय का ? पण छे मला तर ते वय वर्ष २ असलेल्या मूलाने रंगीत खडूने मारलेल्या रेघोट्या वाटतात। २ वर्ष म्हणाले कारण त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलंसुद्धा सुसंबद्ध चित्र काढतात. म्हणजे त्रिकोणी डोंगर, एक घर, नदी, मधून येणारा सूर्य, एक चार आकड्याचा पक्षी, अस काहीतरी. बरं उत्कॄष्ठ रंगसंगती आहे, अगदी नुसत बघायला छान वाटतय असही काही नाही. आणि किंम्मत काही हजार डॉलर्स. म्हंटलं चांगला उद्योग आहे.


परवा माझ्या लेकीने सगळे रंग माझ्या वहीवर सांडले, ते जे चित्र तयार झालं ते पण खूप छान आहे। आता तिला कॅनव्हास आणून देते. सांड किती सांडायच, मग मॉर्नींग, इलूजन, डिप सी, असले शब्द वापरून एक माहिती लिहायची, झाल ऍबस्ट्रॅक्ट आर्ट तयार. म्हंटलं एवढं समजाउन सांगूनसूद्धा कळत नाही म्हणजे माझा प्रोब्लेम असेल असं मला वाटलं. मग मी दोघातिघांना विचारलं, तर त्यांनी मलाच वेड्यात काढलं. अगं तो किती ग्रेट पेंटर आहे. त्याची चित्र अशीच असतात, डिप मिनींगवाली. मला वाटलं आत्ता ते चित्र फाडून बघावं म्हणजे कळेल डीप विदिन काही आहे का ? म्हणजे एकंदरीत कोणालाच कळाल नव्हतं चित्र कसलं आहे ते!!


अरे मग सांगा ना नाही कळालं त्यात लाजायच काय ? अशामुळेच फावत या लोकांचं. कळलं नाही म्हणून स्वत:च हसं करून घेण्यापेक्षा ग्रेट ग्रेट म्हणून न कळणाऱ्यांच्या कळपात अलगद सामील व्हायच. म्हणजे सगळ्यांना माहित असतं, कळल नाहिये पण ते मान्य करायच नाही असा अलिखित नियम असावा.
मग मी खूप शोध घेतला।

एकाने नुसता एक काळा चौकोन काढला होता !!!! अरे काय ? काढा काय हवा तो अर्थ. नाव होतं "ब्लॅक". अरे मला रंग ओळखता येतात. एकाचा नुसता त्रिकोण. मग त्यावर चर्चा चालली होती. इजिप्तच्या पिरॅमिडपासून, डोंगर. उंची दाखवणारं चित्र, वगैरे काहीही. मला फक्त भूमिती आठवली. म्हणजे थोडक्यात फारसा काही स्पष्ट अर्थ नसलेली चित्र. तुम्ही काढाल तो तुमचा अर्थ.


ह्या सगळ्यातून मला अस कळाल, ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की डोंगर, नद्या, किंवा व्यक्तीचित्र लावलं की एका आठवड्याने त्याचा कंटाळा येतो। कारण एकदा-दोनदा बघितलं की ते कळतं (हे महत्वाचं) आणि मग कळलं की रोज तेच बघायचा कंटाळा येतो ( जसा नवऱ्यांना तीच बायको बघायला येतो कितीही सुंदर असली तरी ) तर ऍबस्ट्रॅक्ट आर्ट हे अस चित्र की रोज थांबून जे तुम्हाला बघावसं वाटतं. ते काय आहे हे समजून घ्यावसं वाटतं (समजण्यासारखं काही नसलं तरीही). असा माझा निष्कर्ष, बघा पटतयं का ?


दीपा मिट्टीमनी

Wednesday, September 17, 2008

पछाडलेली

" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, पण मन कान भरेनाच, मग हजारदा ऐकलं। मला त्या गाण्यानं पछाडलच. मग कॅसेटवर ए साइडला शेवटी आणि बी साइडला पहिलं टेप केल. त्यावेळी सीडी, रिपीट असे ऑप्शन नव्हते. अलट पलट चालू राहिलं. सगळे वैतागले ते गाणं ऎकून, पण मला वैतागच येईना, अजूनही येत नाही,


हे अस झपाटलंपण किंवा एखाद्या गोष्टीन पछाडणं फार महत्वाचं असतं आयुष्यात. रोजच्या जगण्याल उर्जेचा स्त्रोत देत राहतात या गोष्टी. हे वेडंच माणसाला शहाण्यासारखं जगायला शिकवतं.
मला आठवत अगदी लहानपणी आम्ही काड्यापेटीचे छाप गोळा करायचो। त्या छंदाने इतकं झपाटलं होतं की रस्त्यावरून चालताना मी खाली बघून शोधतच चालायचे। पार कचऱ्यातले, चिखलात माखलेले छाप गोळा करायचे। कुठे बाहेरगावी फिरायला गेलो, की साइट सीईंगपेक्षा माझ लक्ष रस्त्यावरच्या कचऱ्यावरच। मग ते खूळ संपल। आईलाच हुश्श झाल।


मग कधीतरी उर्दुचं वेड लागलं. डिक्शनरी घेऊन बसायचं, शब्द शोधायचे, अर्थ लावायचे, त्याचा वापर करून बघायचा. मग डोक्यात रात्रंदिवस तेच.
" मेरा कुछ सामान " गाण्यावरून इजाजतपर्यंत पोचले। मग इजाजतमधल्या मायाने पछाडलं. उगाच विचारत राहिले कोण बरोबर कोण चूक. रेखाचंही बरोबर. मायाचंही. चूक कोणाची ? नियती ? आयुष्य ? खूप सारे प्रश्न आणि हे सारे मी वाहत राहिले माझ्याबरोबर. खूप त्रास होतो कधी कधी, अस वेड घेऊन जगण्याचा. कधी कधी ते भूत इतकं मानगुटीवर बसतं की रोजचं जगणं, रोजची कामं अशक्य होऊन बसतात. खोटं सांगत नाहीये.


अबिदा परवीनचं " मन लागो यार फकिरीमें " - संत कबीर हे गाण ऎकलं. नेहमीप्रमाणेच अनेकवेळा, आणि जणू मला विरक्तीच आली. " तू क्यू फिरता मगरूरीमें .......... मन लागो यार फकिरीमें " इतका परिणाम होतो ना माझ्यावर छोट्या छोट्या गोष्टींचा, दिसायला छोट्या पण माझं अस्तित्व व्यापणाऱ्या.
रोज उठून तेच कंटाळवाणं आयुष्य जगताना हे अस पछाडलेपण असलं की आयूष्य कंटाळवाणं राहातच नाही.

दीपा मिट्टीमनी

य़ंत्र

रोजचा पेपर आला। चहा घेता घेता वाचला. आता तुम्ही म्हणाल मग त्यात विशेष काय ? सगळ्यांकडेच येतो रोज. सगळेच वाचतात.

पण आजची बातमीच जरा वेगळी होती। एका माणसाने कहीतरी शोध लावून एक यंत्रमानव बनवलाय, असा की ज्याला भावना आहेत. म्हणजे काही ठराविक गोष्टींमध्ये तो भावनिक चर्चा ही करू शकतो. कसली गंमत ना ? म्हणजे आज गप्पा मारायाला कुणी नाही, म्हणजे अगदी चॅटवरही कुणी नाही तर हा तुमच्याशी बोलेल. बुद्धीबळ खेळायला कुणी नाही, हा तुमच्याशी तुमच्यासमोर बसून खेळेल, तेही भावना ओतून. म्हणजे तुमच्या चालीने त्याचा घोडा मरणार असेल तर त्याला वाईट वाटेल. तसे गेम्स असतातच की कम्पुटरवर, प्रोग्राम केलेले, हजारोवेळा बुद्धीबळ खेळलो असेल. पण तिथे जिंकलो ना तरी जिंकल्याची मजा नाही, कारण समोरच्याला हरल्याच दु:खच नसत. तर अस यंत्र ज्याच्याशी तुम्ही खेळू शकता, आणि ज्याला हरल्याच दु:खही होतं, काय मजा येईल !

नाहीतर कोणाला हल्ली वेळ आहे समोर बसून खेळायला किंवा बोलायला.
तंत्रज्ञान जसं जसं प्रगत होत गेल तसं तसं माणूसपण मागासलेलं होत गेलं। आंतरजालामुळे जग जवळ आल खरं पण माणसं दूर झाली. एक काचेची भिंत निर्माण झाली माणसा माणसांत. जी पारदर्शक तर आहे, माणूस माणसाला दिसतो, हात हलवून हसतो, पण गळाभेटीची सोय नाही. सायकलवर एक पाय ठेऊन दारात मैत्रिणीशी गप्पा मारण्यात जी मजा आहे ती चॅटवर निश्चितच नाही. ती कुजबुज, डोळ्यातील मिश्किल भाव, हात पुढे केल्यावर आपसूक मिळणरी टाळी, या भावना त्या यंत्राने कढून घेतल्या. संवादाची साधनं बरीच आहेय, पण ज्याच्याशी संवाद साधावा असं जिव्हाळ्याचं माणूसच नाही.

बघा भरकवटवलंत ना मला ! तर मी काय सांगत होते, अस भावना असलेला यंत्रमानव बनवलाय अशी बतमी आहे पेपरला बाकी साऱ्या त्याच बातम्या कूठे खून झाला, हुंड्यासठी आत्महत्या (जाळण्याचं दुसर नाव), १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सगळ्या, त्याच त्याच बातम्या. काही फ़रकच पडेनासा झालाय, मनावर ओरखेच उठत नाहीत. इतक दगडी झालंय का मन ? का मन नावाचा अवयवच उत्क्रांतीत गायब झालाय, माकडाच शेपूट गेलं तसं ?

" माणसाचं यंत्र झालंय" ही बातमी पण द्यायला हवी ना छापायला।


दीपा मिट्टीमनी

Friday, September 12, 2008

Thank you

Here is something about my mom n dad। Always in life it happens that our mom n dad r so close in our life that they r taken for granted. You never say sorry or thank you to them for the hurts, the troubles they take on behalf of you. On their 36th annivesary they strictly said that they r not going to accept any gift from us. So I thouhgt of preparing some greeting card for them... started thinking about the matter to write. n so many things came in my mind. Then I realised, today I am here just because of these two persons were my mom n dad. Thank you is a very small word. It is not having that capacity to express my feelings still I have tried.

किती सहजपणे लहान मूल आई बाबा म्हणायला शिकत॥ त्या शब्दाचा अर्थ, त्या नात्यातल वात्सल्य, प्रेम सगळ न ज़ाणवताच..मीही अशीच शिकले असेन कधीतरी आई बाबा म्हणायला ।आपल्या घरात अनेक वस्तु त्यांच्या ठराविक जागा अड्वुन बसलेल्या असतात पण त्यांच महत्व आपल्याला रोज जाणवत नाही इतक्या त्या सवयीच्या झालेल्या असतात .पण जेव्हा त्यांची गरज लागते किंवा त्यांची जागा बदलते तेव्हा त्यांच महत्व लक्षात येत असाचकाहीस घडत नात्यांच्या बाबतीत .आज तुम्हाला सोडून सासरी जेव्हा आले तेव्हा जाणवत किती आपलेपणा आहे ह्या नात्यात .आई-बाबा शब्दाचा खरा अर्थ आत्ता समजतोय .माझ्या अस्तित्वाचा आज मी जी कोणी आहे त्याचा विचार केला तर फक्त तुम्ही दोघ उभे रहाता डोळ्यासमोर आणी मग प्रकर्षाने जाणवल ते एकच हे सगळा मी कधी सांगीतलच नाहीये तुम्हाला . आज तुमच्या लग्नाचा 36 वा वाढदिवस त्यानिमित्ताने तुम्हाला सांगते "YOU BOTH ARE SIMPLY GREAT"मुलावर जे संस्कार होत असतात हे सगळ आईवडिलांच्या जगण्याच प्रतिबिम्ब असत .एक व्यक्ति म्हणून वागण , काही मूल्य जगण, सहजीवनातल समर्पण , परस्पराविषयी विश्वास, हे सगळ तुम्ही मला शिकवल नाहीये गुलाबजामामधे पाक जसा आपोआप झिरपतो तसच शोषत गेले हे सगळ .. पाकात मुरलेल्या गुलाबजामाची सर वरुन साखर घोळवलेल्या गुलाबजामाला येत नाही हे खर नुसत अस वाग अस सांगून तस वागता येत नाही त्याला कुठेतरी आदर्श लागतो तसा माझा आदर्श तुम्ही आहातमुलाला hypnotise करून त्याला एखादी गोष्ट convince करून सांगण ही एक कला आहे .प्रतिकूल परिस्थितीत बी रुजवण्यासारख आहे ते .

माझ्या आयुष्यात हे काम माझ्या आईने केल ।सहज येता जाता पोळ्या लाटताना ओट्यावर, पेंगुळलेल्या रात्री कुशीत शिरताना, लाइट गेल्यावर मेणबत्तिच्या प्रकाशात, कधी CA रिजल्ट नंतर, तर कधी परिक्षेच टेंशन असताना. कधी ऑफिस चं frustration share करताना, कधी डान्स चं first prize मिळवताना……अस एक नाही अनेक वेळा मी आईशी हितगुज केल आहे .आणि हा संवाद कायम दोघिन्चाच असायचा .व पु म्हणतात तस जेव्हा दोन ज़ण असतात तेव्हा तो संवाद असतो त्यांचे तीन झाले कि त्याची चर्चा होते .कायम मैत्रिच्या नात्याने मी आईशी बोलले आहे .त्यामुळे आज़ही कुठलीही गोष्ट discuss करायची असली की मला आई आठवते .i miss you a lot. संस्कृतच्या श्लोकांचे अर्थ सांगण ,माझ्या कवितेला दाद देण पुस्तकांची आवड निर्माण करण, असे अनेक रंग माझ्या आयुष्यात आई तूच भरले आहेस .त्याच्यासाठी थैंक्स हा फार छोटा शब्द आहे.

अगदी प्रत्यक्ष अस मी बाबांकडून काही शिकले नसले तरी अप्रत्यक्षपणे खुप काही घेतल आहे ।त्यांच्यामधली चिकाटी आणि सातत्य खरच घेण्यासारख आहे. ca व्हायच हे बीज बाबांनीच रुजवल .खुप काही केल आहे तुम्ही माझ्यासाठी.

अगदी पहाटेचा ६ वाजता झावरे क्लास असो

नाहीतर रात्रि ९ ची गणपुलेची असो

बारावीत Loyala कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेल तुम्हाला पाहील आहे

अजून आपला सिंहगड़ चढायचा राहिला आहे

CA final च्या परीक्षेत अणून दिलेला लाड़ू

लग्नासाठी आणलेला लाडूगडूचा गडूहात

दुखतो म्हणुन वाचून दखावलेलं audit ही moduleतर

कधी आखुन दिलेल अभ्यासाचं schedule

टाइमपास करताना , कॅरम खेळताना , Not at home

हरतानाअरे तुला म्हंटलं

आहेलग्न करून जाताना , मागे वळून पाहताना ,डोळ्यातलं पाणी मला दिसलं आहे ।

Office च्या गोष्टी सांगताना , उगाच कशावरून तरी भांडतानाएक dress घेऊ म्हणताना , चार dress घरी घेउन येतानाआठवतात तुमच्याबरोबरचे आनंदी

क्षणतुमच्या style मधे गोष्ट सांगताना , अरे रामा लेका रामा

म्हणतानापोट दुखेपर्यंत हसताना , गडाबडा लोळतानाआठवते तुमची काळजी आणि खुप सारं आपलेपण

मी तुमच्याशी किती जोडलेली आहे ते दूर झाल्यावर खुप जाणवलं


Luv u a lot. After becoming a mother I truly understand the efforts that you have taken to bring me up to this level. I am always greatful to you both for that. I am there for you always..throughout my life. I wish god will always choose you two as my mom n dad.
Tumchi

Deepa.....
30th May 2007.

Thursday, September 11, 2008

"फ़ड सांभाळ तुऱ्याला गं आला ... "

"फ़ड सांभाळ तुऱ्याला गं आला ... " मी ट्रेनमधे बसून छान मोठ्या आवाजात गात होते। एक मोकळा श्वास दिलाय ह्या वातावरणाने.

आपल्याला दुसऱ्याची भाषा कळते पण समोरच्याला आपली कळत नाही ह्यात जी गंमत आहे ना ती एकदा अनुभवाच। इथे कॅनडामधे विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे तुम्ही काहीही केलत तरी लोक विचित्र नजरेने बघत नाहीत। केस हिरवे पिवळे लाल निळे रंगवा, कसेही कपडे घाला, उंदराने कुरतडल्यासारखे कापा ... नो वन बॉदर्स.

आपल्या देशात होणारी घुसमट आठवते जरा काही वेगळ केलं घातलं की लोकांच्या नजरा पाठलाग करणार। मला माहीत नाही नजरा पाठलाग करत असतात का आपलच मन मागोवा घेत असतं. बाहेरच्या लोकांच सोडा अनेकदा सुरवात घरातूनच होते. एका चौकटीत जगत राहतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत अनेक छोट्या इछ्चा मनात मारत.

अगदी कालची गोष्ट - एका पार्टीत मी फ़ेस पेंटिंग करून घेतलं तिथे वावरले सगळेच तसे होते। तशीच घरी आले. रस्त्याने कितीतरी लोकांनी पाहिलं असेल. घरी आरशात बघितल्यावर वाटलं बापरे मी अशीच आले रस्त्याने. हेच आपल्या इथे झालं असतं तर प्रत्येकाच्या डोळ्यात येताना मला आरसा दिसला असता.

हे काय केलय असा अधोरेखित डायलॉग न बोलता पोचला असता किंवा त्या नजरेला घाबरून मी करुनच घेतलं नसतं। मलासुध्दा जेव्हा विचित्र दिसतं॥ मी वेगळं म्हणत नाहीये विचित्र म्हणतीये. कारण इथे काही गोष्टी खरच खूप विचित्र असतात तेव्हा माझेही डोळे बोलत असतील का? हा विचार येतो. प्रयत्न करते डोळ्यांना फ़क्त बघायच काम करा अस सांगते।

भावनेसाठी गाणी आहेत ना "फ़ड सांभाळ तुऱ्याला गं आला ... " आपल्याला दुसऱ्याची भाषा कळते पण समोरच्याला आपली कळत नाही ह्यात जी गंमत आहे ना ती एकदा अनुभवाच। जाम मजा येते. तीही दुसऱ्याचं स्वातंत्र्य सांभाळून

दीपा मिट्टीमनी