माझी खोली म्हंटलं की त्याला एक 'मी'पणाचा स्पर्श आहे। आणि तसा प्रत्येकाचं असतच . किरकोळ वस्तू असोत, कवितांची वही असो, फोनवर बोलताना गिरवलेले कागद असोत. त्यात मी असते विखुरलेली. तरीही एकसंध असं काहीतरी. कदाचित सगळ जगणच माझं अस आहे.
म्हणजे कधी मला विरक्ती घ्या अस सांगितल तर बहुदा सगळ्यातला मोह सोडायला मला दोन-चार वर्षं जातील (कमीच सांगितली का ;)
प्रत्येक वेळी नवा छंद , त्याचा सगळा पसारा, दरवेळी वाटतं हां हे आपलं फ़ायनल एम. पण नवखे चार दिवस टिकतात, परत नवा गडी नवीन राज्य. नाही म्हणायला कविताच बरी टिकली खरी. मी कित्येकदा सोडलय तस तिला पण प्रत्येक वेळेस , दूर सोडलेल्या मांजरासारखी मला शोधत शोधत परत आलीये.
कुठे जन्म होतो तिचा अजूनही मला पत्ता नाही। म्हणजे गल्लीच्या टोकापर्यंत तर तिला पाहिलं होत, एवढ्यात कुठे गेली माहीत नाही अस होतं.
तरी मला आवडतं असं विखुरलेलं , आणि अस्ताव्यस्त आयुष्य जगायला। स्वत:च एकटेपण एंजॉय करायला। माणसं हवीतच आजूबाजूला. पण त्या सार्यात माझी एक स्वतंत्र खोली आहे. कदाचित खूप गहिरी, अंतर्मुख, हळवी तितकीच कट्टर. प्रवेश बंद ची पाटी नाहीये दारावर, पण रस्ता इतका अवघड आहे की फ़ार थोडे पोचलेत तिथवर. 'एंजल्स & डेमन्स' मधला लास्ट लेयर समजा. तसा प्रत्येकाचाच असावा थोड्याफ़ार फ़रकाने.
अगदी खूप ओळखीच्या माणसांना तरी आपण किती कमी ओळखतो. अचानक एका दिवशी वाटतं अरे तो असा असेल असं वाटलं नव्हतं. ते वागणं त्या आतल्या खोलीतल्या शेल्फ़वरून चुकुन बाहेर आलेलं असतं.