Saturday, July 24, 2010

आजी

'डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका. हे गाणं सगळ्यात आधी आजीकडून ऐकलं. अनेक भावगीतं तिला तोंडपाठ होती. वयाच्या ८० व्या वर्षी तिच्या ह्या स्मरणशक्तीचं मला आश्चर्य वाटे. मला आजी आठवते ती ह्या अलीकडल्या १० वर्षातलीच. त्याआधी म्हणजे आजोबा असताना बहुधा कुठल्यातरी कामात गुंतलेली. बोलायचं , गप्पा मारायच्या त्या आजोबांशीच. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे ह्या मे मधे तिला जाऊन ४ वर्षं होतील. पण अजूनही अनेकदा गप्पांमधून , किंवा आईकडून उपदेशाचे डोस मिळताना तिची आठवण येत राहते. आमची आई म्हणायची ......... अशी कित्येक वाक्य नकळत आजीला घेऊन येतात. तिची ती छोटीशी मूर्ती, बोळकं तोंड, अखंड बडबड, नऊवारी साडी आठवते.

प्रत्येकाला वाटतो तसा आजीबद्दल मायेचा कोपरा माझ्याही मनात आहे. पण त्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून जेव्हा मी तिचा विचार करते तेव्हा एक आदराची आणि अभिमानाची भावना मनात येते. त्या काळातल्या रीतीनुसार मराठी चौथीपर्यंत शिकली आणि लग्न झालं. योगायोगाची गोष्ट म्हणजे ती नवीन मराठी शाळेत शिकली (माझ्या आठवणीप्रमाणे) आईसुद्धा आणि मी सुद्धा. उगाच अशी नाळ जुळल्यासारखं वाटतं. आजोबा शिस्तीचे, घरात पाहुणे, ९-१० बाळंतपणं, तितकीच लग्नं, बारशी, केळवणं, डोहाळजेवणं......सणवार. सगळं रीतीने निभावणारी. आजोबा हुशार होतेच पण आजीमधेदेखील एक चमक होती. ह्या सगळ्या पसाऱ्यात कुठेतरी हरवून गेलेली. पूर्ण गीतरामायण तिला पाठ होतं. अनेक ओव्या , कुठलीकुठली गाणी म्हणत असायची. आता वाटतं लिहून ठेवायला हवी होती. बारसं, डोहाळजेवण, याची पारंपारिक गाणी आता काळाच्या ओघात त्या पिढीबरोबर लोप पावत चालली आहेत.

एवढ्या सगळ्या राबत्यात माणसाची उर्मी हरवून जाते...पण तिने ती जपली. मला आठवतं मला नऊवारी साडी इतक्या हौशीने शिकवली होती. अजूनही तिच्या दोन साड्या माझ्याकडे आहेत .... नेसायला म्हणून आणलेल्या. तिची एक बॅग होती. जरा वेळ काढून गेलं की एकदा सगळी उजळणी असायची. ही ना काशीकडल्या लग्नात आली. ही मला किरणच्या लग्नात घेतली........असं प्रत्येक साडीचं stock taking झालं की मगच बॅग बंद. आम्ही आपल्या तिची चेष्टा करायचो. किती सांभाळून ठेवशील. नेसायला काढ सगळ्या. पण तिचा जीव गुंतला होता त्यात. एवढ्या नेसल्या जायच्या नाहीत..... मग उजळणीत आनंद.

तिचं ते गोदरेजचं कपाट म्हणजे अलिबाबाची गुहा होती. बिस्कीटाच्या तुकड्यापासून..... सोन्यापर्यंत सगळं असायचं. भेटायला आलेलं माणूस काहीतरी घेऊन यायचं. हिचं खाणं कमी आणि वाटावाटीच जास्त. राणीने आणलेलं विजूला, विजूचं वनाला... असं चालू असायचं. मी गेले की तिला म्हणायचे चला उघडा तुमचा खजिना, आणि करा रिकामा. देण्यासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. आजोबा असताना त्यांनी सगळं ठरवलं असेल पण त्यांच्या पश्चात तिने मनमोकळेपणाने सगळ्यांना आहेर केला.

मला सगळ्या कौतुक कशाचं वाटतं तर आजोबा गेल्यानंतरही ती आनंदाने जगली. दुखतय खुपतय सगळ्या कुरबुरी सांगत औषधं घेत जगली. कुठल्या गोष्टीसाठी रडत नाही बसली. आज कित्येक आज्या आहे आयुष्य म्हणून काढायचं असं करत जगताना आपण पाहतो. पण ह्या सगळ्याचा लवलेषही तिच्यामधे कधी दिसला नाही. कुठेही यायला, जायला, राहायला तयार. सणासुदीला, लग्नमुंजीला नवी साडी नेसून तयार. तिला जे जमेल ते खायची, प्यायची. नको नाही म्हणत कधी कशाला आडकाठी नाही केली. हॉटेलमधे गेलो तरी विचारून काय खाता येईल तेवढं खायची. लिप्टी२ घे (Live52) म्हणजे पचन सुधारेल मला सांगायची.

चश्मा असल्याने छोटं अक्षर दिसायचं नाही. पण सकाळमधल्या सगळ्या हेडलाईन्स वाचायची. कधी आपण बोलत असताना काही संदर्भ आला तर तिला त्याची इत्यंभूत माहीती असायची. एक टेपरेकॉर्डर होता तिच्याकडे. तिला नाही जमायचं कॅसेट लावायला पण आम्हा नातवंडांना सांगायची. गीतरामायणाचा सगळा संच होता तिच्याकडे.

वेगळा टीव्ही पाहिजे म्हणून टीव्ही घेतला होता. केबल होतं. क्रिकेटची मॅच अगदी आवडीने बघायची.

दादामामाकडे जायचं ठरलं तर अगदी उत्साहात तयार होती. कदाचित कधी पुण्याबाहेरही एकट्याने गेली नसेल. एकही इंग्रजी वाक्य येत नसताना , वयाच्या ८० व्या वर्षी एकटीने अमेरिकेला जायची तयारी दाखवणाऱ्या तिच्या खंबीर मनाचं मला कौतुक वाटतं. मला आठवतं आम्ही सगळे तिला कामापुरतं इंग्रजी शिकवत होतं. आणि तिच्यापुरतं ती शिकलीही होती. केवळ मुलाला भेटायच्या दुर्दम्य उत्साहावर ती निघाली होती. पण दुर्दैवाने तिला व्हिसा मिळाला नाही. पण मिळाला असता तर ती नक्की जाऊन आली असती ह्याची खात्री आहे.

अगदी शेवटी तिला जेव्हा दवाखान्यात भेटायला गेले.... तेव्हाही मला खुणेनं विचारलं एकटीच आलीस? प्रविण कुठय? म्हंटलं आलाय. तेव्हा त्याला शोधलं हात केला. तिला म्हंटल लवकर बरी हो. आणि घरी ये. हो म्हणाली. बाहेर आले तोपर्यंत मला अंदाज नव्हता. बाहेर आल्यावर आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि काळजात चर्र झालं. २ दिवस फ़क्त काढले दवाखान्यात. कायम म्हणायची अशी हिंडती फ़िरती आहे तोवर ने मला. लोळागोळा होऊन नको पडायला. देवाने खरच ऐकलं तिचं.

आज आपण mental piece, personality development च्या गोष्टी करतो. हसत खेळत, सुखासमाधानाने जगणाऱ्या माझ्या आजीची personality मला बरंच काही शिकवून गेली. शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची उर्मी ठेऊन, प्रत्येकाच्या आयुष्यात एक आनंदाचं रोप लावून, भाजणीच्या थालीपीठाचा खमंग स्वाद आमच्या मनात ठेऊन ती निघून गेली. तिनेही अनेक दु:ख बघितली, अनेक जवळच्या लोकांचं मरण बघितलं. पण ह्या साऱ्यातून मार्ग काढत, चेहऱ्यावर अढी किंवा आठी न ठेवता अत्यंत प्रसन्न मनाने जगली. तिच्या समृद्ध जगण्यातले कण आपल्याही वाट्याला आले. त्या कणांची जाण ठेऊन आपणही समृद्ध जगूया.

दीपा.

डोहाळजेवण

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो. सगळ्यांना हवीहवीशी गोड बातमी कानावर येते. सगळ्यांच्या मनात आनंद उत्साह. तिच्याही मनात असतो अपार आनंद. पण त्याबरोबर असते एका कोपऱ्यात कुठेतरी एक अनामिक भीती, थोडं जवाबदारीचं ओझं. पण सगळ्यात सुखद वाटतं ते एकच..."मी आई होणार"

"आई".... अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केले आहेच. पण मला वाटतं "आकलनापलीकडचं ईमान" म्हणजे आई. बाळाशी जी नाळ जोडली जाते ती कायमचीच. बाळ जन्माला आल्यानंतर ती physically कापली तरी वात्सल्याच्या रुपात किंवा काळजीच्या रुपात आई कायम जोडलेलीच राह्ते.

आता हे आईपण येतं कुठून? अत्यंत चंचल, हळवी, असमजूतदार मुलीचं अचानक वास्तल्यमूर्तीत रुपांतर होतं कसं? बाळ पोटात असल्यापासून जपण्याचे संस्कार रुजत जातात. दिसामासांनी जसं ते आकार घेत असतं तसंच तिच्याही नकळत तिच्यातलं आईपण जन्माला येत असतं.

डॉक्टर, सोनोग्राफ़ी, iron, folic, गर्भसंस्कार, व्यायाम सगळं काही सुरु होतं. बाळगुटी, शेक , खाणंपिणं यावर सगळ्यांचे सल्लेही सुरु होतात. How to develop your baby's intelligence? असे क्लासही सुरु होतात. पण ह्या सगळ्यात आई कसं व्हायचं हे कुणीच शिकवत नाही. आता तुम्ही म्हणाल त्यात शिकवायचं काय?. .... पूर्वीची गोष्ट वेगळी होती. मुलात मूल वाढत होत. जेवत होतं शिकत होतं. पण सध्याच्या जमान्यात सगळं काही Best देण्याच्या मागे फ़िरताना होणारी दमछाक वेगळी आहे. अनेक भावंडांवरुन एकुलत्या एक अशा उरलेल्या पिढीवर अपेक्षांचा डोंगरही तेवढाच मोठा आहे. Cut Throat competition आणि Reality shows च्या गराड्यात बालपण हरवतय. आई होणं म्हणजे ह्या सगळ्याचं जाणतं भान असणं. झापडं लावून पळण्याऐवजी का? हा प्रश्न पडणं गरजेचं आहे. Ready, Instant, immediate असं सगळं हवं असताना मूल वाढवताना लागणारा Patience शिकवणं गरजेचं आहे. मुबलक पैसा आणि सुबत्ता असली तरी ’नाही" म्हणण्याचा अधिकार शिकवणं गरजेचं आहे.

बाळासाठी जीव तुटत असताना स्वत:च्या करियरची होणारी ओढाताण, शाळांचे प्रवेश, अवास्तव मागण्या, मुलांचे हट्ट, सगळीकडे सगळं पुरवताना "आई" ची होणारी ससेहोलपट खरंच अवघड आहे.

ह्या सातव्या महिन्याच्या उंबरठ्यावर डोहाळजेवणाच्या निमित्ताने हे सगळं बोलावसं वाटलं. फ़ुलांनी सजवताना, झोपाळ्यावर झुलवताना प्रार्थना एवढीच की तुझी चित्तवॄत्ती आनंदी राहू दे. दोह्रुद असलेल्या तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. सगळं काही सुखरूप होईलच. आईपण येतंच ते सजगपणे निभावण्यासाठी हा सारा अट्टाहास. नऊ महिने होणारे सगळे कष्ट त्या इवल्याशा जिवाच्या दर्शनाने शमतात आणि मनातल्या सगळ्या प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळतात.



सुखावलेल्या धरतीत जेव्हा अंकूर रुजतो
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

स्वप्नं फ़ुलतात,
डोहाळे लागतात,
इवलीशी पावले चाहूल देतात
धडधडत्या काळजाचा नाद सुरु होतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

कसं होईल? काय होईल?
अगणित प्रश्नांची घाई
कळा देताना खूप खूप
दुखतं का गं आई ?
सगळं काही सोसायचं बळ जेव्हा येतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

थोडी चिडचिड होते
थोडी तडफ़ड होते
करियर की बाळ
अशी स्पर्धा सुरु होते
इवल्याश्या जिवणीचाच मोह जडू लागतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

ते हसणं ते बोलणं
ते रांगणं नि धडपडणं
काळजीच्या काजळीनं
काळजाला गाठणं
सुखाचा अश्रू जेव्हा डोळ्यालगत येतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

पळू नकोस लागतं
हे सांडतं ते भाजतं
जरा थोडं ऐकलं तर
सांग तुझं कात जातं
माझ्यातल्या आईला जेव्हा माझ्या आईचं मन कळतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं


दीपा कुलकर्णी मिट्टीमनी .