"फ़ड सांभाळ तुऱ्याला गं आला ... " मी ट्रेनमधे बसून छान मोठ्या आवाजात गात होते। एक मोकळा श्वास दिलाय ह्या वातावरणाने.
आपल्याला दुसऱ्याची भाषा कळते पण समोरच्याला आपली कळत नाही ह्यात जी गंमत आहे ना ती एकदा अनुभवाच। इथे कॅनडामधे विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे तुम्ही काहीही केलत तरी लोक विचित्र नजरेने बघत नाहीत। केस हिरवे पिवळे लाल निळे रंगवा, कसेही कपडे घाला, उंदराने कुरतडल्यासारखे कापा ... नो वन बॉदर्स.
आपल्या देशात होणारी घुसमट आठवते जरा काही वेगळ केलं घातलं की लोकांच्या नजरा पाठलाग करणार। मला माहीत नाही नजरा पाठलाग करत असतात का आपलच मन मागोवा घेत असतं. बाहेरच्या लोकांच सोडा अनेकदा सुरवात घरातूनच होते. एका चौकटीत जगत राहतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत अनेक छोट्या इछ्चा मनात मारत.
अगदी कालची गोष्ट - एका पार्टीत मी फ़ेस पेंटिंग करून घेतलं तिथे वावरले सगळेच तसे होते। तशीच घरी आले. रस्त्याने कितीतरी लोकांनी पाहिलं असेल. घरी आरशात बघितल्यावर वाटलं बापरे मी अशीच आले रस्त्याने. हेच आपल्या इथे झालं असतं तर प्रत्येकाच्या डोळ्यात येताना मला आरसा दिसला असता.
हे काय केलय असा अधोरेखित डायलॉग न बोलता पोचला असता किंवा त्या नजरेला घाबरून मी करुनच घेतलं नसतं। मलासुध्दा जेव्हा विचित्र दिसतं॥ मी वेगळं म्हणत नाहीये विचित्र म्हणतीये. कारण इथे काही गोष्टी खरच खूप विचित्र असतात तेव्हा माझेही डोळे बोलत असतील का? हा विचार येतो. प्रयत्न करते डोळ्यांना फ़क्त बघायच काम करा अस सांगते।
भावनेसाठी गाणी आहेत ना "फ़ड सांभाळ तुऱ्याला गं आला ... " आपल्याला दुसऱ्याची भाषा कळते पण समोरच्याला आपली कळत नाही ह्यात जी गंमत आहे ना ती एकदा अनुभवाच। जाम मजा येते. तीही दुसऱ्याचं स्वातंत्र्य सांभाळून
दीपा मिट्टीमनी
No comments:
Post a Comment