"चला बाय. हॅव अ नाईस वीक एन्ड ""बाय, सोमवारी भेटू गं. दोन दिवस नाहीयेस ना ........ एन्जॉय. "
खूप दिवसांत जमलं नव्हतं. ह्या शनिवरी रविवार अगदी वेळ काढून गावी जायचं ठरवलं. आजोबा गेल्यापासून तिथलं घर बंद पडलंय. जी काही थोडीफ़ार शेती होती ती विकायचा धीर होईना. आजोबा होते तो पर्यंत शेवटपर्यंत सगळं बघत होते. इतक्या वर्षानुवर्षं असलेली जमीन थोड्याफ़ार पैशासाठी विकली नाही. एक गडी ठेवलाय तो बघतो सगळं. मी अधूनमधून चक्कर मारून येते. पण एवढ्यात तेही जमलं नव्हतं.
अलार्म वाजला. दूर कुठेतरी काहीतरी वाजतंय एवढीच जणीव झाली. मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. शनिवारी सकाळी पण लवकर उठायचं म्हणजे जीवावर येतं. पण आज कार नव्हती. नेमकी दुरूस्तीला गेली होती. म्हणजे धडपडत जाऊन एस.टी. पकडली पाहिजे.
सुखवस्तू राहायची सवय झाली की छोट्या छोट्या गोष्टीतले कष्टसुद्धा नकोसे वाटू लागतात. इतकी वर्ष कार नव्हती तेव्हा एस. टी. च्या जिवावरच सगळं चाललं होतं. पण आज तोच वास, ती अडाणी गर्दी नको वाटत होती. सगळे विचार झटकून आवरलं. बस पकडली. खिडकीजवळची जागा पकडून बसले.
थोड्या वेळाने एक कळकट धोतरवाला माणूस आला.
"ताई वाईच सरकून घ्या."
मी आखडून बसले, त्याचा स्पर्श होऊ नये असा अशक्य प्रयत्न करत. त्याच्या अंगाला खास गावातल्या शेणाचा वास येत होता. त्याने चंची काढली, सुपारीची खांड कातरून तोंडात टाकली. डोक्याचा फेटा सोडला, त्यालाच हात पुसले. टीश्यू पेपर ची सवय झालेल्या माझ्या शहरी मनाला कसंसंच झालं.
मी दुर्लक्ष करून बाहेर बघू लागले. हवा छान होती. प्रसन्न आणि ताजी. घाट, डोंगर, श्रावणातली ओली हिरवळ पसरलेली. मन गावात जाऊन पोचलं होतं. पण आत आजीची वाट बघणारी नजर नसेल दारात.
"थांब गं पोरी, तुकडा ओवाळून टाकते. मग आत ये."
असं म्हणणारं पण कोणी नसेल. पण अंगणातला पारिजातक असेल, माझ्यासाठी मखमली गालिचा पसरून वाट बघत असेल. दार उघडताना कडी कुरकुरेल. किती दिवसांनी आलीस असं विचारेल.
विचार करता करता कधी गाव आलं कळालंच नाही . वाड्याचं दार उघडलं , कडी कुरकुरली. ओळखीचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं . खूप दिवस बंद राहिल्याचा कोंदट वास भरला होता. सगळी दारं खिडक्या सताड उघडी टाकली . कोण आलंय बघायला उन्हाचे कवडसे डोकावले. वार्याने सगळीकडे फ़िरून पाहिलं . आता कसं घर भरल्यासारखं वाटलं. कितीतरी वेळ नुसतीच बसले.
बाहेर ओसरीवर कुणाचीतरी चाहूल वाटली म्हणून बाहेर आले. बघितलं तर शिरपा.
"अरे शिरपा तू होय. ये ये. तुला बरा सुगावा लागतो मी न कळवता आले तरी."
"तसं न्हाई ताई . चावडीवर एक पोरगं भेटलं . त्याने पाह्यलं तुम्हास्नी. त्येच्याकडून कळलं."
"झालं म्हणजे गावभर खबर झाली असणार."
"अवं ताई , शंभर एक उंबर्याचं गाव. कुणी शिंकलं तरी कळणार. तर तुमचं येणं लपणार हाये होय ?"
"बरं बरं .. तुला निरोप पाठवणारच होते . मलाही खूप दिवसात यायला जमलं नाही . काय खबरबात. कसं चाललंय सगळं?"
"ठीक हाये. वरच्या रानात पेरणी झालीया. औंदा पाऊस तर चांगला झालाया. इकडच्या तुकड्याचा ऊस तोडणीला आलाय. कारखान्याची दरयेळची बोंब हायेच. बघू पुढच्या आठवड्यात एकदा पाणी फ़िरवून मग लावू तोडणीला. बिगारी बी मिळेनासं झालेत आजकाल. जो तो शहरात पळतोय. तुमी नगा काळजी करू. मी बघतो की सगळं. तुमी आलासा तं आरामात र्हावा चार दिस. सदा आपली लगबग. शेवंताला धाडतो सफ़ाईला."
"अरे नको. मी घेईन तेवढं करून. तसंही उद्या संध्याकाळी जायचंय परत"
"गाडी न्हाई दिसली:
"नाही आणली ह्या खेपेला"
"खालच्या मळ्यातली केळी लागली का रे?"
"लागायला लागलीयेत. केळफ़ूल पाठवतो. हाये माझ्या ध्यानात सारं"
मी हसले. शिरपा शेतीचं सारं बघत होता. अगदी मन लावून. कधी पैशाचा हव्यास नाही. फ़सवाफ़सवी नाही. हिशोबाला चोख. मला सगळं जमेना तेव्हा त्याला वाटेकरी करून घेतला. तसंही शेतावर राबणं... राबणं सोडाच नुसती देखरेख करणं हेदेखील मला शक्य नव्हतं. शहरी माणसांचं काम नाही. शिरपा बघायला लागल्यापासून मी निश्चिंत झाले होते. आजोबा असताना तो आमची गुरं सांभाळायचा. नंतर गुरं विकली. त्याची स्वत:ची जमीन नव्हती. पण त्याला शेतीतली माहिती चांगली होती. म्हणून त्याच्यावर सोपवलं.
"बस रे. मी चहा टाकते. मलाही घ्यायचाच आहे. आणि आत येऊन बस. ऊन तापायला लागलंय"
"न्हाई ताई. च्या नगं. आणि मी इथच ठीक हाये."
"आत चल आधी मुकाट्याने."
मी चहा टाकायला आत गेले. आधण ठेवलं. कपबशा काढायला गेले आणि आजीची आठवण झाली.
" खालच्या फ़डताळात गडी माणसांसाठी वेगळ्या कपबशा अहेत. त्यात दे. उगाच लाडावून ठेवू नकोस."
मला हसायला आलं. मी नेहमीच्या वापरातल्याच दोन कपबशा काढल्या. शिरपा आत आलेला दिसला.
"अरे वर बस. खाली नको बसूस."
"न्हाई न्हाई. मी हिथं ठीक हाये."
चहा घेऊन बाहेर आले. एक कप शिरपासमोर धरला.
" ठेवा खाली ताई. मी घितो."
मी कप खाली ठेवला. अशाच गप्पा मारत मारत चहा झाला. शिरपाने चहा घेऊन बाहेरच्या नळावर कप विसळून परत आणून खाली ठेवला.
"ताई पाणी घालून घ्या."
"शिरपा काही गरज आहे का याची? मी तुला कधी असं वागवलय का? शिवू नकोस, घरात येऊ नकोस म्हंटलंय का कधी?"
"तसं न्हाई ताई . तुमी वाईट वाटून घेऊ नका. पण सवयच झालीये. आणि गावातले लोक....."
"हे बघ. मी हे अस्पृश्य वैगेरे काही मानत नाही. आणि गावातले लोक काय विचार करतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही."
"ताई तुम्ही शिकल्यासवरल्या. शहरात राहता म्हणून असा विचार करता. पण गाव अजून तसच हाये."
"हो पण किती दिवस. आता बदलायला हवं ना. जग कुठे चाललय?"
"ताई रागावू नका अशा. सवय न्हाई जात. ५-६ वर्षाचा व्हतो तवाधरनं बा बरुबर गुरं राखाया जायचो. बामनाच्या वाड्यावर गेलो की बा सारखा सांगायचा. हिथं बस, आत जाऊ नगंस, कशाला हात लावू नगं . अन त्यादिवशी बामनाची पोर अंगणात खेळत हुती. खेळताना पडली म्हणून उचलायला धावलो. चाबकाचे फ़टके बसले पाठीवर शिवाशिव केली म्हणून. बा जे सांगायचा प्रयत्न करत हुता ते त्यादिवशी रक्तात भिनलं"
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शिरपा जो बामन म्हणत होता ते कदाचित माझेच आजोबा..... अंगावर काटा आला. माझंच रक्त आता बेइमानी करून उठलं. डोकं सुन्न झालं. काहीच सुचेना.
"जाऊ द्या ताई. तुमी नगा तरास करून घेऊ."
"अरे पण काळ बदलला आता."
"ताई काळ बदलला पण रक्त न्हाई बदललं. जे रक्तातून वाहतं पुसता न्हाई येत ताई."
शिरपाने मला निरुत्तर केलं. मला काय बोलावं सुचेना. मला सकाळची एस.टी. आठवली. अंग चोरून बसलेली मी. .....अंगात वाहणारं रक्त........ चाबकाचे फ़टके........ड़ोळे धूसर झाले. कुठल्याशा प्रेरणेने मी म्हणाले.
" चल तुझं खोपटं दाखव मला. उद्या पिठलं भाकरी खायला येणार आहे."
"ताई पण...."
" चल म्हंटलं ना ...."
रक्त पण बदललंय हे सिद्ध करायचं होतं मला जणू........
दीपा कुलकर्णी -मिट्टीमनी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
आपके विचार काफ़ी अच्छे है. अपने ब्लाग मे यदि आप हिन्दी का प्रयोग करे तो अच्छा रहेग.
Post a Comment