Wednesday, September 17, 2008

य़ंत्र

रोजचा पेपर आला। चहा घेता घेता वाचला. आता तुम्ही म्हणाल मग त्यात विशेष काय ? सगळ्यांकडेच येतो रोज. सगळेच वाचतात.

पण आजची बातमीच जरा वेगळी होती। एका माणसाने कहीतरी शोध लावून एक यंत्रमानव बनवलाय, असा की ज्याला भावना आहेत. म्हणजे काही ठराविक गोष्टींमध्ये तो भावनिक चर्चा ही करू शकतो. कसली गंमत ना ? म्हणजे आज गप्पा मारायाला कुणी नाही, म्हणजे अगदी चॅटवरही कुणी नाही तर हा तुमच्याशी बोलेल. बुद्धीबळ खेळायला कुणी नाही, हा तुमच्याशी तुमच्यासमोर बसून खेळेल, तेही भावना ओतून. म्हणजे तुमच्या चालीने त्याचा घोडा मरणार असेल तर त्याला वाईट वाटेल. तसे गेम्स असतातच की कम्पुटरवर, प्रोग्राम केलेले, हजारोवेळा बुद्धीबळ खेळलो असेल. पण तिथे जिंकलो ना तरी जिंकल्याची मजा नाही, कारण समोरच्याला हरल्याच दु:खच नसत. तर अस यंत्र ज्याच्याशी तुम्ही खेळू शकता, आणि ज्याला हरल्याच दु:खही होतं, काय मजा येईल !

नाहीतर कोणाला हल्ली वेळ आहे समोर बसून खेळायला किंवा बोलायला.
तंत्रज्ञान जसं जसं प्रगत होत गेल तसं तसं माणूसपण मागासलेलं होत गेलं। आंतरजालामुळे जग जवळ आल खरं पण माणसं दूर झाली. एक काचेची भिंत निर्माण झाली माणसा माणसांत. जी पारदर्शक तर आहे, माणूस माणसाला दिसतो, हात हलवून हसतो, पण गळाभेटीची सोय नाही. सायकलवर एक पाय ठेऊन दारात मैत्रिणीशी गप्पा मारण्यात जी मजा आहे ती चॅटवर निश्चितच नाही. ती कुजबुज, डोळ्यातील मिश्किल भाव, हात पुढे केल्यावर आपसूक मिळणरी टाळी, या भावना त्या यंत्राने कढून घेतल्या. संवादाची साधनं बरीच आहेय, पण ज्याच्याशी संवाद साधावा असं जिव्हाळ्याचं माणूसच नाही.

बघा भरकवटवलंत ना मला ! तर मी काय सांगत होते, अस भावना असलेला यंत्रमानव बनवलाय अशी बतमी आहे पेपरला बाकी साऱ्या त्याच बातम्या कूठे खून झाला, हुंड्यासठी आत्महत्या (जाळण्याचं दुसर नाव), १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सगळ्या, त्याच त्याच बातम्या. काही फ़रकच पडेनासा झालाय, मनावर ओरखेच उठत नाहीत. इतक दगडी झालंय का मन ? का मन नावाचा अवयवच उत्क्रांतीत गायब झालाय, माकडाच शेपूट गेलं तसं ?

" माणसाचं यंत्र झालंय" ही बातमी पण द्यायला हवी ना छापायला।


दीपा मिट्टीमनी

No comments: